नाशिक : महानगरपालिका निवडणुकीसाठी दि. २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज स्वीकृती, अर्ज माघारीपासून ते चिन्ह वाटपापर्यंत सहाही विभागात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निवडणूक कक्षात सर्व घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना पायबंद घालणे शक्य होणार आहे. दरम्यान, यंदा संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. दि. २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या कालावधीत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जाणार असून, त्यानंतर दि. ४ फेबु्रवारीला छाननी प्रक्रिया होणार आहे. दि. ७ फेबु्रवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे, तर दि. ८ फेबु्रवारीला चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. महापालिकेमार्फत प्रत्येकी तीन प्रभागांकरिता एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा निवडणूक अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी दहा निवडणूक अधिकारी महापालिकेला उपलब्ध करून दिले आहेत. महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयात निवडणूक कक्ष उभारण्यात येणार असून, त्या-त्या ठिकाणी जाहीर केलेल्या प्रभागांतील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. दरम्यान, प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया आणि अर्ज माघारीप्रसंगी निवडणूक कक्षात राजकीय पक्ष-उमेदवारांकडून गोंधळ घातला जात असल्याच्या घटना होत असल्याने निवडणूक कक्षातील सर्व घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी यंदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सुमारे ११ लाख रुपये खर्चाची तयारी ठेवत त्याकरिता निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक कक्षाप्रमाणेच मतमोजणीच्या ठिकाणीही सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्यामुळे होणाऱ्या गैरप्रकारास पायबंद बसणार आहे.
निवडणूक कक्षात सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: January 15, 2017 1:24 AM