सिन्नर : गणेशमूर्ती विसर्जन करतांना जलसाठे प्रदूषित होणार नाही यासाठी प्रशासनाकडून काळजी केली जात आहे. सरदवाडी धरण, कुंदेवाडीचा बंधारा अशा वापरातील पाण्याच्या जागेत गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे समन्वय समिती, नगरपरिषद महसूल विभाग व पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे.शहराजवळील सिल्व्हर लोटस् शाळेतील जलतरण तलावात मूर्ती विसर्जित कराव्यात व जलप्रदूषण टाळावे, असे आवाहन शाळेचे संचालक दिलीप बिन्नर यांनी केले आहे. या तलावाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली व तेथे जास्तीत जास्त नागरिकांनी मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले. सरदवाडी स्मशानभूमी जवळील वाहणारा ओहळ, सिल्वर लोट्स स्कूलच्या जलतरण तलाव येथे मूर्ती विसर्जन करण्यासाठी जागा निश्चीत करण्यात आली आहे.शहराजवळील सरदवाडी धरणात मूर्ती विसर्जनास दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थांकडून परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. कुंदेवाडी येथील बंधाºयात विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याने तेथेही मूर्ती विसर्जन करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.जलस्त्रोत दूषित होवू नयेत यासाठी नगरपालिकेकडून ठिकठिकाणी निर्माल्य संकलन केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी दिली. त्यासाठी आठ पथके तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.यंदा सरदवाडी हे धरण पूर्णपणे ओव्हरफ्लो झाले आहे. या पाण्यावर सहा-ते सात गावांची तहान भागविण्याचे काम केले जाते. धरणात पाणीसाठी प्रदूषित होऊ नये यासाठी त्यात मूर्ती विसर्जन करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. राजाभाऊ वाजे यांच्या सोशल ग्रुपने जलपदूषण थांबविण्यासाठी निर्माल्य संकलन करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यासाठी राजाभाऊ सोशल ग्रुपचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
सिन्नरला गणेश विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 5:03 PM