लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासण्यासाठी आता सर्वच विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच गतिमान प्रशासनाचा एक भाग म्हणून यापुढे प्रत्येक फायलींना बारकोड पद्धत टाकण्यात येणार असून, त्यासाठी ई-टपाल पद्धत सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांना सोमवारी (दि.२९) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात येऊन त्यासाठी २२ लाखांची ठोस तरतूदही ठेवण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सार्वजनिक मालमत्तेचे परीक्षण खर्चाच्या सदरात जिल्हा परिषदेच्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था करणे. तसेच जिल्हा परिषदेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा संच बसविणे तसेच वायफाय सुविधा विकसित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करताना सदस्यांनी त्यासाठी असलेली दहा लाखांची तरतूद कपात करण्याची सूचना केली. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी विनंती करीत मुख्यालयात कोण थांबतो, कोण थांबत नाही. याच्या तक्रारी आपणच करता. खातेप्रमुखांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती तसेच कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी १६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यालय इमारतीच्या सुरक्षेचाही एक भाग असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या तरतुदीस सभागृहाने मान्यता दिली.यापुढे जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांवर ‘तिसऱ्या’ डोळ्याची अर्थात कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, फाइल गहाळ आणि चोरीला जाण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. विशेषत: फायलींचा प्रवास रोखण्यासाठी बारकोडिंग महत्त्वाचा उपाय राहणार आहे.
खातेप्रमुखांवर राहणार सीसीटीव्हीची ‘नजर’
By admin | Published: May 30, 2017 12:01 AM