नाशिक : शहरातील कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत निकाली निघण्याची शक्यता आहे़ मंगळवारी (दि़१७) मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत शहरातील ३१८ ठिकाणी एक हजार दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त असून, शहर पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्ताव लवकरच माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठवून त्याचा अभ्यास केला जाणार आहे़ सिंहस्थासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही बसविण्यात आले होते़ यामुळे शहरातील गर्दीसोबतच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात वा चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते़ मात्र सिंहस्थात तात्पुरत्या अर्थात भाडेतत्त्वावर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही नंतर काढून घेण्यात आले़ या प्रश्नावर मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांनी अनेकदा शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसविण्याचे सुतोवाच केले होते़ त्यानुसार पोलिसांनी सविस्तर व विस्तुत अहवालही शासनास सादर केला मात्र त्यावर निर्णय होत नव्हता़ राज्यातील काही शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया सुरु झाली असली तरी नाशिकमध्ये तशा कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या़ तसेच याबाबत विधीमंडळ अधिवेशनातही ठोस निर्णय न झाल्याने शहरातील सीसीटीव्हीचा प्रश्न प्रलंबित पडला होता़ दरम्यान, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली असून, पुढील तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मुंबईतील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सीसीटीव्हीस मान्यता
By admin | Published: January 18, 2017 12:05 AM