वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या व प्रमुख जागृत देवस्थान म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड ओळखला जातो. राष्ट्रसंत भगवानबाबांनी हा गड अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उभारला आहे. वंजारी समाजाबरोबर इतर समाजामध्ये भगवानबाबांना मानणारा मोठा वर्ग आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये एकोपा रहावा यासाठी भगवानगडाची उभारणी केली आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून भगवानगडाकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून बाबांनी शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधनाचे मोठे कार्य करत प्रबोधन केले. समता, बंधुभाव, एकता, मानवता या प्रबोधनकार्यासाठी आयुष्य भर प्रचार केला. त्यामुळे त्यांची जयंती आणि पुण्यतिथी राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांत साजरी करण्यात यावी, अशी मागणी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश केकाण, शशिकांत घुगे, ज्ञानेश्वर शिरसाठ, शिवाजी बडे, निलेश सानप आदींसह वंजारी सेवा संघाचे पदाधिकारी यांनी केली आहे.
(फोटो ०५ वंजारी) राष्ट्रसंत भगवानबाबांची जयंती व पुण्यतिथी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत साजरी करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देताना दिनेश केकाण, शशिकांत घुगे, ज्ञानेश्वर शिरसाठ, शिवाजी बडे, निलेश सानप आदी.