औंदाणे : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, शासनाचे नियम पाळूनच, साजरी करू या शुभ दीपावली’ याप्रमाणे मुंजवाड (ता. बागलाण ) येथील जनता विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर आहिरे यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील फलकावर रेखाटनाच्या माध्यमातून आपल्या बोलक्या भावना चित्रातून व्यक्त करत समाजप्रबोधनपर संदेश दिला आहे.
सध्या कोविडमुळे शाळा बंद, पण शिक्षण सुरू या शासनाच्या धोरणानुसार कलाशिक्षक अहिरे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने रेखाटनाचे धडे देत आहेत. नेहमीच समाजातील चालू घडामोडीवर आधारित रेखाटन करतात. सध्या सर्वत्र दिवाळीच्या सणामुळे सामाजिक वातावरण उल्हासित आहे, भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण उंबरठ्यावर आहे आणि त्यातच कोरोनाचे सुलतानी संकट समाजासमोर आहे. हा दुहेरी विचार करत अहिरे यांनी चित्र विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील फलकावर रेखाटून बहिणींना आगळीवेगळी भेट दिली आहे. सदर चित्रातून दिवाळी साजरी करताना शासनाचे कोरोनाविषयक नियमांचे पालन हा समाजप्रबोधनपर संदेश चित्रातून समाजास दिला आहे.
सदर चित्रासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. देसाई, पर्यवेक्षक एस. पी. सोनवणे आदींचे सहकार्य लाभले.
(फोटो १५ औंदाणे)
मुंजवाड येथील जनता विद्यालयातील कलाशिक्षक दिंगबर आहिरे यांनी शाळेच्या फळ्यावर काढलेले दिवाळीतील चित्र.