सिन्नर : जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असलेल्या सिन्नरवासीयांनी पारंपरिक सण-उत्सव साजरा करण्याची प्रथा चांगल्या पद्धतीने जपली आहे. यापुढील काळातही सिन्नरकरांनी विविध प्रकारचे प्रदूषण टाळून हरित गणेशोत्सव साजरा करून नवलौकिक कायम राखावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख अंकुश शिंदे यांनी केले. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर, वावी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी यांची बैठक पार पडली. यावेळी गणशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य यांना मार्गदर्शन करतांना शिंदे बोलत होते. नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शांतता समितीच्या बैठकीत गणशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व शांतता समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या विविध सूचनांवर अधीक्षक शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. राज्याच्या जडणघडणीत गणशोत्सवाचे योगदान मोठे असल्याचे शिंदे म्हणाले. गणशोत्सवामुळेच अनेक नेते व कार्यकर्ते घडले. गणेशोत्सवाची सर्वांना माहिती आहेच; त्यामुळे मार्गदर्शन करण्याऐवजी आपण केवळ उजळणी म्हणून शांतता समितीची बैठक घेतल्याचे शिंदे म्हणाले. शासनाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव अभियान सुरू केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊन शहर व तालुक्यातील मंडळांनी जास्तीत जास्त पारितोषिके मिळवावी, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव काळात मंडळांच्या अडीअडचणी व सर्वांमध्ये समन्वय असावा यासाठी महसूल, पोलीस, वीज वितरण व अन्य खात्याचे एक संयुक्त पथक असावे यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या संयुक्त पथकामुळे अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते असे ते म्हणाले. सण-उत्सवामध्ये काही अपप्रवृत्तींनी प्रवेश केला आहे. त्या बाजूला काढून शांततेत व मोठ्या आनंदात गणेशोत्सव व येणारे सण साजरे करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. गणेशोत्सवात समाजपयोगी देखावे सादर करावे, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छता राखावी व गणेशोत्सवाचा महिला व आबालवृद्धांना बिनधास्तपणे आनंद घेता येईल अशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वातावरण निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले. कायदा पोलीस बनवत नाही, तो लोकप्रतिनिधी बनवतात. राजकारण गरम झाल्यानंतर कायदा आणखी जागरूक होतो. त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला. वाईट कृत्यामुळे नाव बदनाम होणार नाही याची काळजी घेऊन शहराचे नाव चांगले ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व शहराचा नावलौकिक कायम राखावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.शहरातील खड्डे बुजवावे, जलप्रदूषण टाळावे, वादग्रस्त देखावे व बॅनर टाळावे, अवैध धंदे बंद करावे, स्वच्छता मोहीम राबवावी, एक गाव एक गणपती उपक्रम राबवावा, विसर्जन मिरवणूक वेळेचे बंधन पाळावे, सण-उत्सवाच्या काळात दारू दुकाने बंद ठेवावीत आदिंसह अनेक सूचना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, डॉ. विष्णू अत्रे, विष्णू गोजरे, ईलियास खतीब, खंडेराव सांगळे, मच्छिंद्र चिने यांच्यासह उपस्थितांनी मांडल्या. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची व स्वच्छता मोहीम पालिकेकडून राबविली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अश्विनी देशमुख यांनी दिली. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते यांनी नागरिकांच्या सूचनांना उत्तरे दिली. उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश शिंगेटे, हरिभाऊ कोल्हे, सहायक निरीक्षक रणजित आंधळे, उपनगराध्यक्ष संजय नवसे, नगरसेवक मल्लू पाबळे, विजय जाधव, शैलेश नाईक, मेहमूद दारूवाला, राजश्री कपोते, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे, राजाराम मुरकुटे, रवींद्र काकड, संजय झगडे, विनायक सांगळे, दीपक खुळे, पिराजी पवार, संजय चव्हाणके, काशिनाथ भालेराव, मनीष गुजराथी, पंकज जाधव, मच्छिंद्र चिने यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, गणशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
हरित गणेशोत्सव साजरा करून नावलौकिक राखा
By admin | Published: August 27, 2016 10:12 PM