कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे दिल्ली येथे निधन झाले. गेली काही दशके नाशिक काँग्रेसच्या राजकारणावर व तत्कालीन कॉँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे चांगलेच सख्य होते. तत्कालीन समवयस्क असलेले कै. मुरलीधर माने यांच्यासारख्या कामगार कार्यकर्त्याला थेट लोकसभेत पाठविण्यात त्यांचा पुढाकार होता तर त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जयप्रकाश छाजेड यांच्या उमेदवारीसाठी कामत यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले वजन खर्ची घातले होते. नाशिक हे जणू माहेरघरच असल्यागत कामत यांचा नाशिकला वरचेवर होणाºया दौºयातील घडलेल्या प्रसंगांना बुधवारी कॉँग्रेसजनांनी आठवणींना उजाळा दिला.१९८०च्या दरम्यान काँग्रेसमध्ये चांगल्या तरुणांची फळी होती. गुरुदास कामत हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना नाशिकमध्ये मुरलीधर माने हे प्रदेश काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष होते, त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेली दोस्ती पुढेही कायम टिकली. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुका होत असताना गुरुदास कामत यांनी युवक काँग्रेससाठी महाराष्ट्रामध्ये दोन जागा मागितल्या होत्या. त्यापैकी एक जागा स्वत:साठी तर दुसरी जागा मुरलीधर माने यांच्यासाठी मागितली होती. प्रदेश काँग्रेस जर युवक कॉँग्रेसला एकच तिकीट देणार असेल तर ते मुरलीधर माने यांना द्या, असे त्यांनी सांगून कार्यकर्त्याचा बहुमान केला होता. त्यावेळी प्रदेश काँग्रेसने मुरलीधर माने यांना उमेदवारी दिली आणि मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी झाले. मायको कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करणाºया सामान्य कार्यकर्त्याला संसदेची कवाडे कामत यांनी उघडी करून दिली होती. नाशिकच्या राजकारणात ज्येष्ठांबरोबर ‘दा- बा- ना’ गट कार्यरत होता. दा म्हणजे जयप्रकाश छाजेड दादा, बाबा म्हणजे सुरेश भटेवरा आणि मुरलीधर माने म्हणजे नाना असा तो गट होता. पक्षात गटबाजी असल्याने त्यावेळी अनेक वाद मिटविणे किंवा विविध निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना कामत यांची भूमिका मोलाची राहिली आहे. संघटनेत तरुणांना न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह धरणारे कामत नाशिकला अनेकदा आले होते. तत्कालीन काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटणारा आणि त्यांच्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी भांडणारा असा कार्यकर्ता होता. त्यांच्या निधनामुळे नाशिकमधील जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणी जागविल्या.
गुरुदास कामत यांच्या आठवणींना नाशकात उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:44 AM