ठाणगाव : तालुक्यातील ठाणगाव येथे जनसेवा मित्रमंडळाकडून पानिपत युद्धाच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ शौर्य दिन साजरा करण्यात आला.माजी सरपंच नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात जनसेवा मंडळाचे अध्यक्ष रामदास भोर यांनी १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या रणसंग्रामात वीरमरण आलेल्या मराठा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्र आपले आहे, आणि आपल्या राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे या भावनेतून मराठे ही लढाई लढत होते. दुर्दैवाने इतर प्रांतांतील लोकांमध्ये ही भावना नसल्याने त्यांनी मराठी फौजेला मदत न केल्याने दिवसभर लढून अगदी अखेरच्या क्षणी ही लढाई मराठे हारले. परंतु ही लढाई हरूनही मराठे जिंकले होते, कारण अहमदशहा अब्दालीची हिंदुस्थानवर हल्ला करण्याची हिम्मत झाली नाही, असे प्रतिपादन जनसेवा मंडळाचे सागर भोर यांनी केले. यावेळी नामदेवराव शिंदे, डी. एम. आव्हाड, रामदास भोर, उपसरपंच शेखर कर्डिले, आदिनाथ शिंदे, पालवे उपस्थित होते.
ठाणगावी पानिपतच्या स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:16 PM