येवला : दिवाळीच्या सणात पणतीला विविध तऱ्हेने आकर्षक सजवून जीवनात प्रकाशपर्व फुलविण्याच्या संधीचं सोनं करीत शहरातील युवती, महिलांनी प्रकाशाच्या या सणाच्या पणती सजावट स्पर्धेची खऱ्या अर्थाने मजा लुटली.येवल्यात खटपट मंच सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पर्वाचा वसूबारसला प्रारंभ करीत पणती उत्सव साजरा करीत वातावरणात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नेहरू युवा केंद्र व खटपट युवा मंच आयोजित उत्कृष्ट पणती सजावट स्पर्धेचे उद्घाटन श्री संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष नंदलाल भांबारे यांच्या हस्ते झाले. १५ वर्षाच्या आतील गटात प्रथम माधवी चांडक, द्वितीय श्रृती नाळके, तृतीय साक्षी घोडके तर उत्तेजनार्थ रेणुका कुंभकर्ण व वैष्णवी भुसनळे यांनी तसेच १५ वर्षाच्या वरील गटात प्रथम पूजा तुपसाखरे, द्वितीय शीतल तुपसाखरे, तृतीय बेबी न्याती तर उत्तेजनार्थ माया काबरा, वेदाय देसाई या स्पर्धकांना पारितोषिके मिळाली. विजेत्यांना खटपट युवा मंचच्या वतीने प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मेडल तसेच सतीश समदडिया यांच्याकडून प्रथम क्रमांकास सेमी पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, शंकरलाल टाक, बाबासाहेब वाघ, संतोष खंदारे यांनी केले.याप्रसंगी मंचचे अध्यक्ष मुकेश लचके यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. दत्तात्रय नागडेकर यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. कार्यक्रमास रंगनाथ खंदारे, रमेश भांबारे, सोमनाथ लचके, मधुसूदन शिंदे, रामा तुपसाखरे, श्रीकांत खंदारे, वरद लचके आदि उपस्थित होते.(वार्ताहर)
येवल्यात रंगली पणती सजवा स्पर्धा
By admin | Published: October 27, 2016 10:55 PM