सिन्नर: यांत्रीकीकरण व पशूधनाची कमतरता यामुळे शेतकरी कुटूंबाकडेही बैलं दिसेनासे होत आहेत. म्हणून शाळेतील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सजलेली बैलजोडी प्रत्यक्ष बघणेही शक्य होत नाही. येथील एस. जी. प्राथमिक शाळेत मात्र सजलेली बैलजोडी व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची शेतकरी वेशभूषेत नटून थठून येऊन शेतकरी गीतावर नृत्यही सादर करीत बैलपोळ्याचा आनंद द्विगुणित केला.लोकशिक्षण माध्यमिक शिक्षण संस्थेचे सचिव राजेश गडाख यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सण उत्सव व परंपरा यांची माहिती व्हावी, यासाठी दरवर्षी विद्यालयात पोळा वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा करण्याची संकल्पना अंमलात आणली व यावर्षीही ती राबवली गेली. शनिवारी सकाळपासूनच शाळेत संपूर्ण वातावरण ग्रामीण खेड्यासारखे निर्माण करण्यात आले होते. प्रवेशद्वारावर तोरण बांधून शेतकरी वेशभूषेतील विद्यार्थी स्वागत करीत होते.मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर गुरूळे, सागर भालेराव, सुधाकर कोकाटे, मंदा नागरे यांच्या नियोजनातून पार पडलेल्या पोळा उत्सवात सर्व विद्यार्थ्यांना पोळा सण समजून घेता आला. पालक बाळासाहेब गवळी यांनी सजलेली खिल्लारी बैलजोडी आणली होती. सर्जा-राजाचा तो रूबाब बघून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाला उधान आले होते. ‘धरतीची आम्ही लेकरं...’ ही चौथीची कविता नृत्यरूपाने विद्यार्थ्यांनी सादर करत वातावरण अधिकच खुलले. छोटे छोटे चिमुकले रुबाबदार शेतकरी वेशभूषेत मिरवत होते. जीजा ताडगे व सागर भालेराव यांनी बैलपोळा सणाची पार्श्वभूमी स्पष्ट करून माहीती दिली.