नाशिक : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) नाशिक शहर व परिसरात अपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त जुने नाशिकमधून खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ‘जुलूस ए मुहम्मदी’ मिरवणूक काढण्यात आली.जुने नाशिकमधील चौकमंडई येथून दुपारी ४ वाजता मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणूक मार्गावर आकर्षक सजावट व स्वागतकमानी, धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. अग्रभागी सजविलेल्या बग्गीमध्ये खतीब व शहर ए काझी मोईजुद्दीन सय्यद विराजमान होते. यावेळी सय्यद मीर मुख्तार अशरफी पैगंबर यांचा संदेश व जीवनकार्याचा परिचय देत होते. मिरवणुकीत सहभागी मंडळांचे कार्यकर्ते पैगंबर यांच्यावर आधारित स्तुतीपर काव्य पठण करत मार्गस्थ होत होते. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत झाले. तसेच खजूर, नानकटाई, सोनपापडी, पेढे आदी खाद्यपदार्थ सामूहिक वाटप केले जात होते. पहिले मंडळ ६ वाजता बडी दर्गा मैदानात पोहचले. मिरवणूक चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, आझाद चौक, नाईकवाडीपुरा, चव्हाटा, काझीपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहिद अब्दूल हमीद चौक, पिंजारघाटमार्गे बडी दर्गामध्ये पोहचली. खासदार हेमंत गोडसे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद सिंगल यांनी पुष्पहाराद्वारे खतिब ए शहर हिसामुद्दिन यांचे स्वागत करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मिरवणूक मार्गावर आकर्षक सजावट, धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले होते. दरम्यान ईदनिमित्त मध्यरात्रीपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बडी दर्गा, जहांगीर मशीद, शाही मशीद या ठिकाणी पैगंबरांच्या मुहेमुबारकचे (पवित्र केस) दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटपासून बागवान पुरासह ठिकठिकाणी सर्वधर्मीय अन्नदान करण्यात आले. ईदनिमित्त घरोघरी ‘फातेहा ख्यानी’ होऊन प्रसादाचे (खीर-पुरी) वाटप करण्यात आले. मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. ठिकठिकाणी प्रवचन तसेच पैगंबरांवर आधारित स्तुतीपर काव्य स्पर्धा (नात-ए-पाक) उत्साहात पार पडल्या. वडाळारोडवरील शहीद अश्पाक उल्लाखान चौकातील मैदानात सुरू असलेल्या बारा दिवसीय प्रवचनमालेचा समारोप करण्यात आला.चादरींचे वाटप‘ईद-ए-मिलाद’च्या पार्श्वभूमीवर महेबुबे सुहाब्नी ट्रस्टच्या वतीने थंडीचा कडाका लक्षात घेऊन गोरगरिबांना उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. गंगाघाट, महामार्ग, रेल्वेस्थानक, बडी दर्गा परिसर आदी विविध ठिकाणच्या सर्वधर्मीय गोरगरिबांना खतीबे नाशिक हाफीज हिसामुद्दिन अशरफी, हाजी रऊफ पटेल आदींच्या हस्ते सदर चादरींचे वाटप करण्यात आले.नाशिकरोडला मिरवणूकइस्लामधर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती नमित्त ईद-ए-मिलादुन्नबीची काढण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मिरवणुकीमध्ये ३५ चित्ररथासह हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. गोसावीवाडी येथून प्रथेप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता मौलाना यांच्या हस्ते धार्मिक विधी होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी मौलाना मुफ्ती रहेमान रजा मिसवाही, मौलाना हाफिज मुस्ताक, मौलाना जफर खान, मौलाना अब्दुल अजीज, मौलाना हारूण रशिद आदी विविध मशिदींचे मौलाना सहभागी झाले होते.
‘ईद-ए-मिलाद’निमित्त शहरात मिरवणूक जल्लोष : विविध धार्मिक उपक्रम, आकर्षक सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:01 AM
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) नाशिक शहर व परिसरात अपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
ठळक मुद्दे‘जुलूस ए मुहम्मदी’ मिरवणूक स्तुतीपर काव्य पठण करत मार्गस्थ मशिदींवरही आकर्षक रोषणाई