नाशिक : भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषिपंचमी. शहरात पारंपरिक पद्धतीने ऋषिपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. ऋषिपंचमीनिमित्त गोदाघाट महिलांच्या गर्दीने गजबजलेला होता. शनिवारी (दि. २६) पहाटेपासून महिलांनी गंगेवर पवित्र स्नानासाठी गर्दी केली होती. सप्तऋषींची पूजा करण्यास यादिवशी प्राधान्य दिले जाते. कश्यप, अत्री, भारद्वाज, जमदग्नी, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम या सात ऋषींच्या पूजेला या दिवशी महत्त्व असते. त्यानुसार महिलांनी आघाड्याचे पान डोक्यावर घेत गंगेत स्नान करून गणपती, शंकराची पिंड, नवग्रह, सप्तऋषींच्या मंदिरात जाऊन पूजा केली. देवतांना फुले, दूध, दुर्वा, सोळा पत्री, बेल आदी अर्पण करण्यात आले. महिलांनी दिवसभर उपवास केला. ज्यांचा उपवास नव्हता अशा महिलांनी ऋषीची भाजी बनवून नैवेद्य गणपतीला दाखवत त्याचा आस्वाद घेतला. बैलाचे कष्ट न घेता तयार होणाºया भाज्याच या भाजीसाठी लागतात. आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरण्याची परंपरा आहे. त्यानुसार फळभाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळे अशा प्रकारच्या १६ किंवा २१ भाज्यांपासून ही भाजी तयार केली जाते. अशा भाज्यांचा नैवेद्यही अनेक ठिकाणी बनविला गेला. ऋषिपंचमीनिमित्त स्नान व दर्शनासाठी महिलांनी गंगेवर गर्दी केल्यामुळे गंगाघाट फुलून गेला होता. गंगेला सध्या मुबलक पाणी असल्याने भाविकांना समाधानाने स्नानाचा आनंद घेता आला. घरी पूजा करून ऋषिपंचमीच्या कहाणीचे वाचन, मनन करण्यात आले. याशिवाय यथाशक्ती दानधर्म करण्यावरही भर देण्यात आला.दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जनज्यांच्या घरी दीडच दिवसाचा गणपती असतो, त्यांच्याकडून विधिवत पूजेसह वाजतगाजत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे दिवसभर रामकुंडासह गंगाघाटावर दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनाचीही धांदल दिसून आली.
पारंपरिक पद्धतीने ऋषिपंचमी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:48 AM