नाशिक : कापडपेठेतील व्यंकटेश बालाजी मंदिरात घटस्थापना होऊन ब्रह्मोत्सवास सुरुवात झाली. सकाळी भूपाळी आरती होऊन अॅड. हर्षवर्धन व सौ. ऐश्वर्या बालाजीवाले यांनी पुण्याहवाचन बसवले, त्यानंतर श्रींची रथातून मंदिर परिक्रमा होऊन श्रींची स्वारी सिंह वाहनावर आरूढ झाली. सायंकाळी सुदर्शन दिग्विजय रथ मिरवणुकीला सुरुवात होऊन पारंपरिक मार्गाने मिरवणूक सवाद्य निघाली. रथयात्रेत महंत डॉ.रमेश बालाजीवाले हे देवासमोर चालत होते तर, रथ मिरवणुकीचे संचालन अॅड. हर्षवर्धन बालाजीवाले यांनी केले. राजेश नासिककर, गोसावी बंधू, विक्र म बालाजीवाले, डी. पी. कुलकर्णी, पीयूष देसाई, शिवराम मूर्ती आदिंनी रथाचे सारथ्य केले. रथाचे स्वागत शहरातील विविध मंडळांकडून करण्यात आले. सोमवार पेठेत पोळ गुरुजींच्या घरी रथ नमस्कारास थांबला. पुढे भद्रकालीचे दर्शन घेऊन टेकावरून पार्श्वनाथ गल्लीतून हुंडीवाला लेनमार्गे सरकारवाड्यापासून कापडपेठेत परत मंदिरात आला. नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, पैठणकर व रोकडोबा मंडळाचे सदस्य रथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. मंदिरात परतल्यावर रथाची विधिवत पूजा होऊन सुदर्शन दिग्विजय चक्र मंदिरात आसनाधीन करण्यात आले.
बालाजी मंदिराचा रथोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:07 AM