नाशिक : गोविंद बोलो, गोपाल बोलो..., हरे रामा, हरे कृष्णा...च्या जयघोषाने शहरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्मोत्सवाचा धार्मिक सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व श्रीकृष्ण मंदिरांमध्ये राधा-कृष्ण यांच्या मूर्तीभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. मध्यरात्री १२ वाजता सर्व मंदिरांमध्ये मोठ्या जल्लोषात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली.आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने श्री राधा-मदनगोपाल मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात श्री राधा-कृ ष्णाच्या विग्रहाची सुंदर सजावट करण्यात आली होती. सकाळपासून मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. जन्मोत्सवाला पहाटे पाच वाजता मंगल आरतीपासून प्रारंभ झाला. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत प्रवचनाचा कार्यक्रम झाला. तसेच श्रीकृष्णाच्या विविध लीला प्रदर्शित करणाऱ्या लघुनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच ‘हाऊ टू कनेक्ट टू इस्कॉन’ या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले.महानुभाव पंथीयांच्या वतीने जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. महानुभव पंथीय श्रीकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोदाघाटावरील चक्रधरस्वामी मंदिर, मोरवाडीतील दत्त मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, मुरलीधर मंदिर, भांडीबाजार, कृष्ण मंदिर, कृष्णनगर, स्वामिनारायण मंदिर, गंगापूर गावातील श्रीकृष्ण मंदिर यांसह आदि ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर पहावयास मिळत होती. रात्री कृष्णजन्मानिमित्त पाळणा म्हणण्यात आला व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यानिमित्त श्रीकृष्ण मंदिरांच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्मोत्सवाचा सोहळा
By admin | Published: September 05, 2015 11:32 PM