नाशिक : जिल्हा रुग्णालयासह शहरातील विविध आरोग्य संस्था, रुग्णालये या ठिकाणी जागतिक परिचारिका दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला़ परिचारिकांच्या आद्यजनक फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ जिल्हा रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय व वसतिगृहात प्रभारी आरोग्य उपसंचालक तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन होले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे यांनी शुभेच्छा दिल्या़जिल्हा शासकीय रुग्णालयात फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष मानिनी देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ यावेळी मेणबत्त्या पेटवून सर्व परिचारिकांचा सेवेचा शपथविधी संपन्न झाला़ परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात यानिमित्त संपूर्ण सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी उपस्थित परिचारिकांना पुष्पगुच्छ तसेच फुले देत शुभेच्छा दिल्या. डॉ. जगदाळे यांनी फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या सेवाकार्याची माहिती देऊन परिचारिकांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. परिचारिका या डॉक्टरांपेक्षाही मोठी सेवा करीत असून, रुग्णांच्या सतत संपर्कात राहून त्यांची औषधे, देखभाल त्या आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे घेत असतात़ जिल्ह्यात परिचारिकांची संख्या कमी असतानाही त्या करीत असलेले कार्य मोठे आहे़ जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग तसेच परिचारिका यांच्यामुळेच जिल्हा रुग्णालयास कायाकल्पचा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळाल्याचे जगदाळे यांनी सांगितले़ यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गजानन होले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे, माजी संचालक सतीश पवार, वैद्यकीय अधिकारी अर्चना पाटील, आनंद पवार, परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष मानिनी देशमुख, पूजा पवार, के. डी. पवार, प्रतिभा गोसावी, शालिनी उज्ज्वल, सरल कुलकर्णी, मीरा पगार, वैशाली पराते, ज्योती पाटील, कल्पना पहाडे, शीतल सरोदे, उषा क्षीरसागर आदी उपस्थित होते.देवळाली कॅम्पला परिचारिकांचा सत्कारदेवळाली कॅम्पसह ग्रामीण भागातील सुमारे ३२ गावांना आरोग्य सुविधा देणाऱ्या छावणी परिषदेच्या रूग्णालयातील परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ४जागतिक परिचारिका दिनानिमित्त छावणी परिषदेच्या रुग्णालयातील परिचारिकांचा सत्कार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका आशा गोडसे व चंद्रकांत गोडसे यांच्या वतीने भैरवनाथ महिला सेवाभावी संस्था व शिवनेरी प्रतिष्ठानच्या यांच्या वतीने परिचारिकांना हॅण्ड सॅनिटायझर व रुमाल भेट देण्यात आले. यावेळी मधुकर गोडसे, दत्तात्रय गायकवाड, रोशन गोडसे, प्रदीप पाटील, गणेश देवकर आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात विविध उपक्रमांनी परिचारिका दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:18 AM