पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील असोली ते कळमथे या दोन्ही गावाच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या सिमेंट प्लग बंधा-यामुळे शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आह. एक वर्षापासून अपूर्ण असलेले काम शेतक-यांनी स्वत: निधी देऊन पूर्ण केल्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.गेल्या चार वर्षांपासून साठवण बंधा-याच्या मंजुरीसाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आमदार जे. पी. गावित यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळ चकरा मारत होते. सदर बंधा-यास मंजुरी मिळाल्यानंतर गावित यांच्या आमदार निधीतून २३ लाख रूपयांचा निधी देण्यात आला तरीही बंधा-याचे काम पूर्ण होत नव्हते. त्यामुळे आसोली,पाळे खुर्द, कळमथे या गावातील गिरणानदी लगत ज्या शेतक-यांच्या विहीरी आहेत त्यांनी एकत्र येऊन उर्वरित निधी जमा करुन दिला. त्यातून सिमेंट प्लग बंधारा पूर्ण झाल्यामुळे परिसरातील सिंचनाचा प्रश्न अखेर मिटण्यास मदत झाली आहे. आसोली, कळमथे,हिंगवे,पाळे बु., पाळे खु,हिंगळवाडी परिसरातील शेतजमिनीस तसेच पाणीपुरवठा योजनेस लाभ होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे ,नागरिकांकडून स्वागतअसोली येथील नागरिक शशी निकम, सतीश पाटील ह्यांनी आपल्या शेतकामातील ट्रॅक्टर व त्याला सहाशे लिटरची टाकी जोडून दिवसातून रोज सिमेंट प्लग बंधा-याला स्वखर्चाने पाणी मारले. शेतक-यांनीच एकत्र येऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सोडविल्याने नागरिकांमध्ये या कृतीचे स्वागत होत आहे. सिमेंट प्लग बंधा-याची लांबी ६५ मीटर असून उंची साडेतीन मीटर आहे. या बंधा-यासाठी २५ शेतक-यांनी प्रत्येकी २० हजार रुपये गोळा करुन उर्वरित निधी उभा केला.
शेतक-यांनी उभारला सिमेंट प्लग बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 4:18 PM
पाळेखुर्द : अपुरा निधी देऊन पूर्ण केले बांधकाम
ठळक मुद्दे शेतक-यांनी स्वत: निधी देऊन पूर्ण केल्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.