शहरात कडक निर्बंधांमुळे विविध उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक अटी शर्तींसह काही व्यवसायांना परवानगी देण्यात आली तर व्यापारी प्रतिष्ठानांना वेळा ठरवून दिल्या. तसेच कामगार, मजूर यांच्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांना सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली. शहरात यंत्रमागसह बांधकामे सुरू आहेत. यात विषेशतः बांधकाम उद्योगात लागणारे सिमेंट, लोखंडाच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ झाली आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी निर्बंध नसतानाही दर मागणी असूनसुद्धा स्थिर व नियंत्रणात होते. आता लोखंड (स्टिल)चे दर पंधरा ते विस रुपयांनी महागले आहेत तर सुमारे २७५ रुपये ते ३०० रुपये असलेली सिमेंट बॅग सरसकट ३५० ते ४०० रुपयांनी वधारली आहे. वास्तविक लॉकडाऊन नसताना व मागणी असताना दर वाढले नाही; परंतु गेल्या दीड महिन्यात बांधकामे पन्नास टक्के सुरू असतानाही दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
कोट...
लोखंड व सिमेंटच्या दरांवर नियंत्रण यायला हवे. पेट्रोल, डिझेल दरवाढ, वाहतुकीचा वाढलेला खर्च यामुळे लोखंड, सिमेंट दर वाढल्याचे वरिष्ठ पातळीवर सांगितले जाते; परंतु स्थानिक बाजारपेठेत व ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
- सतीश कलंत्री, घाऊक सिमेंट व्यापारी, मालेगाव.