नाशिक : गंगापूररोडवरील जेहान सर्कल येथे असलेल्या महापालिकेच्या लोखंडी दिशादर्शक कमानीवरील सीमेंटशीट कोसळून एका कारचे नुकसान झाले तर दुचाकीवरील इसम जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत मोठी दुर्घटना टळली असली तरी पावसाळ्यात अशा प्रकारचे सीमेंटशीट धोकादायकठरून मोठी दुर्घटना घडू शकते असेच दिसून आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कमानीवरील उर्वरित धोकादायक सीमेंटशीट काढून टाकल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक तसेच जाहिरात कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. या लोखंडी कामानीवर अनेक ठिकाणी जाहिरातींसाठी सीमेंटशीट लावले जातात. नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे सीमेंटशीटचे स्क्रू गंजल्यामुळे आणि वादळवाºयामुळे शीट खिळखिळे होऊन कोसळले असावे, अशी शक्यता अग्निशामक दलाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे या मार्गावर वाहनांची वर्दळ सुरू असताना कमानीवरील सीमेंटशीटचे तुकटे पडण्यास सुरुवात झाली. सुुरुवातीला दोन दुचाकीस्वार प्रसंगावधान राखत स्वत:चा बचाव करून निघून गेले. मात्र त्यामागोमाग आलेल्या एका दुचाकीस्वाराच्या मानेवर आणि पाठीवर काही भाग कोसळला तर त्या पाठीमागून येणाºया कारच्या काचेवरच यातील काही भाग पडल्याने कारचेही नुकसान झाले.कमानीवरील सीमेंटचे तुकडे पडत असल्याने परिसरातील काही तरुणांनी प्रसंगावधान राखून या मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करून अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पालिकेच्या काही कर्मचाºयांनी कमानीवरील तसेच रस्त्यावर पडलेले सीमेंटचे तुकडे बाजूला केले. कमानीवरील काम सुरू असल्यामुळे पर्यायी मार्गाने कॉलेजरोड मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती.कमानीवरील धोका वाढलाकमानीवर लावण्यात आलेले सीमेंटचे शीट हे पावसाळ्यात सुरक्षित नसल्याचे जेहान सर्कलवरील घटनेमुळे दिसून आले आहे. भर वर्दळीच्या मार्गावरच या कमानी असल्यामुळे सीमेंटशीट लावण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी येथे जमलेल्या नागरिकांकडून करण्यात आली. याबाबतच्या स्पष्ट सूचनादेखील संबंधित एजन्सीला देण्याची मागणीही करण्यात आली.
दिशादर्शक कमानीवरील सीमेंटशीट कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 1:12 AM