नाशिक : भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी एबी फॉर्म वाटपासाठी इच्छुकांकडून दोन लाख रुपये घेतल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी पक्षाने बचावात्मक भूमिका घेत शिवसेनेसह विरोधकांवर टीका करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपाची तिकिटे दोन लाख रुपयाला विकल्याचा आरोप चुकीचा व निराधार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आहे. तिकीट वाटपाच्या वेळी नव्हे, तर उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पैसे घेण्यात आले असून, विरोधाकांकडून त्यांच्या पक्षातील गैरव्यवहार झाकण्यासाठी भाजपावर आरोप केले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात शिवसेनेच्या तिकीटवाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही भाजपाने यावेळी केला. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एबी फॉर्म वाटप करताना दोन लाख रुपये मागितल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केल्यानंतर प्रादेशिक नेतृत्वाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून आमदार अपूर्व हिरे यांच्यावर या प्रकरणी खुलासा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांसारख्या पक्षांवर गुप्त युती करण्याचा आरोप करीत निशाना साधला. दरम्यान, भाजपाला उमेदवार न देता आलेल्या प्रभाग क्रमांक ११ अ मधून वैशाली अहिरे यांना व २५ ब मधून अर्चना शिंदे यांना पुरस्कृत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बचावात्मक भूमिकेतून सेनेवर आरोप
By admin | Published: February 06, 2017 11:24 PM