कर्ज, स्वयंरोगाराचे पोर्टल
बेरोजगार तरुणांसाठी कर्ज प्रकरणे तसेच रोजगाराबाबतच्या अनेक योजना आहेत; परंतु हे सर्व विखुरलेल्या स्वरूपात आहेत. तरुणांना वाव देणाऱ्या या सर्व यंत्रणांना एकाच पोर्टलखाली आणण्यासाठी नवीन पोर्टल जिल्हा प्रशासन सुरू करणार आहे. नवीन वर्षात तरुणांना एका पोर्टलवर योजना, कर्ज प्रकरणे तसेच उपक्रमांची माहिती उपलब्ध होणार आहे. जेणेकरून तरुणांची धावपळ कमी होऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून पार्टल नवीन वर्षात सुरू होणार आहे.
सेवा हमी ऑनलाइन
साडेदहा लाखांपेक्षा अधिक सेवा वेळेत दिल्याबद्दल सेवा हमी कायदा आयुक्तांनी कौतुक केलेल्या उपक्रमाचे नवीन वर्षात विस्तारीकरण होणार आहे. सेवा हमी योजनेंतर्गत शंभरपेक्षा अधिक सुविधा नागरिकांना दिल्या जात आहेत. सध्या ही ऑफलाइन सुविधा असून आता ही सेवा नवीन वर्षात जलद होणार असून ऑनलाइन सेवा दिली जाणार आहे. ऑनलाइनच्या माध्यमातूनच त्यांना त्यांच्या कामांची पूर्तता करता केली जाणार आहे. नागरिकांना कार्यालयात चकरा मारण्याचीही गरज पडणार नाही.
शिवभोजन थाळी केंद्रे
महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवभोजन थाळी केंद्रांमध्ये नवीन वर्षात वाढ होणार आहे. सध्या जिल्ह्यात ४५ ठिकाणी शिवभोजन थाळीची केंद्रे आहेत. नवीन वर्षात ही संख्या ६० पर्यंत पोहचणार आहे. जिल्ह्यात अनेकांनी या केंद्राची मागणी केलेली आहे. अवघ्या पाच रुपयात मिळणाऱ्या थाळीमुळे अनेकांना आधार झाल्याने केंद्रे वाढविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.