यापूर्वी राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परीक्षा केंद्र होते. उत्तर महाराष्ट्रात कोठेही परीक्षा केंद्र नसल्याने नाशिक, धुळे, जळगाव, नगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील हजारो विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी अन्य शहरांमध्ये जावे लागत असे. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होऊन विद्यार्थी आणि पालकांचा वेळ आणि पैसाही वाया जात असे. नाशिक येथे परीक्षा केंद्र नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असे. यातूनच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परीक्षा केंद्र व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून खा. हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. आयोगाने एका परिपत्रकाद्वारे देशभरातील चार नवीन परीक्षा केंद्रांना मंजुरी दिली असून त्यामध्ये अलमोरा (उत्तराखंड), श्रीनगर (उत्तराखंड), नाशिक (महाराष्ट्र), सुरत (गुजरात) या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा नाशिक येथील केंद्रावरच होणार आहेत. त्यासाठी लवकरच ऑनलाइन साइट ओपन होणार असून नाशिक सेंटर हा पर्याय दिसणार आहे.
यूपीएससी परीक्षेसाठी नाशिकला सेंटर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:10 AM