नाशिक : पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना कारवाईची आठवण करून देत विभागीय आयुक्तांनी पोलीस विभागाची जबाबदारीही अधोरेखित केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेला मध्यवर्ती समन्वय कक्ष आता गुंडाळला जातो की काय, असे वाटत असतानाच हा कक्ष कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अवैध धंदे रोखणे ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नव्हे, तर महसूल तसेच दंड करणाऱ्या अन्य यंत्रणांनी त्यांच्या कार्यकक्षेत कारवाया कराव्या, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मध्यवर्ती समन्वय कक्ष’ स्थापन करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांपासून या कक्षाच्या माध्यमातून कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु अधिकाराच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये सुरू झालेल्या या ‘पॅटर्न’विषयीच्या तक्रारी मंत्रालय तसेच गृहसचिवांपर्यंत पोहोचल्याने त्याचे चांगलेच पडसाद उमदले. नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस यंत्रणेला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देत पारंपरिक कामकाजाची पद्धत मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका, असेदेखील सुनावले हेाते. नाशिकच्या या कथित पॅटर्न विषयी उपमुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना तोडगा काढण्याचे आदेश दिल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन सर्वच विभागांना कामकाजाची संहिता आणि कार्यक्षेत्रातील अधिकाराबाबत आठवण करून दिली. विशेषत: अवैध धंदे रोखणे ही पोलिसांचीच जबाबदारी असल्याचे अधेारेखित केले. त्यामुळे या वादावर पडदा पडला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्ष बंद होणार असे वाटत होते; परंतु जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हा कक्ष कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. कक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या समन्वयातून कारवाया परिणामकारक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
--कोट--
समन्वयाची भूमिका
वेगवेगळे विभाग काही वेळा कारवाईच्या स्वरूपानुसार स्वतंत्र कारवाई करतात, तर काही वेळा एकत्रित कारवाई करावी लागते. त्यामुळे समन्वय कक्ष अत्यंत उपयोगी आहे. उदाहरणार्थ मालेगाव येथील कत्तलखान्यावरील कारवाई, मागील काही दिवसांमध्ये दारूबंदीविषयक कारवाई ही त्याची उत्तम उदाहारणे आहेत. आजसुद्धा पोलिसांनी एका हुक्का पार्लरवर कारवाई केली व समन्वय कक्षाला कळविले. त्यानंतर समन्वय कक्षाने त्याचे गुमास्ता लायसन्स रद्द करण्याबद्दल शॉप ॲक्ट विभागाला कळविले. अशा प्रकारे कक्ष समन्वयाची चांगली भूमिका करीत आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.