लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व त्यानंतर राज्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीने रिक्त राहिलेल्या बीएससी नर्सिंगच्या ९१४ जागा भरण्यास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्रालयाने दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मंजूर असलेल्या बीएससी नर्सिंगच्या ९१४ जागा राज्यात रिक्त अद्यापही रिक्त आहेत. विधानसभेच्या निवडणुका व पाठोपाठ अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती उद््भवल्याने नर्सिंगच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते. गुणवत्ता यादीनंतर भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे संस्थेकडे अहवाल पोहोचविणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थी नर्सिंग प्रवेशप्रक्रियेपासून वंचित राहिले होते. त्या अनुषंगाने राज्यभरातील नर्सिंग विद्यार्थ्यांच्या वतीने इंडियन नर्सिंग कौन्सिल सदस्य तथा खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे नर्सिंग प्रवेशास मुदतवाढ मिळण्यासाठी नर्सिंग महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांनी विनंती केली होती. त्यानुसार कट आॅफ तारखेच्या मुदतवाढीचा विचार न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल व त्याचबरोबर महाविद्यालयांचेदेखील मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नसर््िंाग महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार डॉ. पवार यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांची भेट घेऊन मुदतवाढ मिळण्याची विनंती केली होती. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाने इंडियन नर्सिंग कौन्सिलमार्फत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे खासदार डॉ.भारती पवार यांनी सांगितले. या मुदतवाढीने इंडियन नर्सिंग कौन्सिलमार्फत ए.एन.एम., जीएनएम, बेसिक बीएस्सी नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएस्सी नर्सिंग, एमएससी या नर्सिंग कोर्सेसकरिता दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.