नाशिक : देशातील बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला एकीकडे ५२ वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे केंद्र सरकार पुन्हा एकदा सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचे नियोजन करीत असल्याचा आरोप करीत सरकारच्या या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात कॅनरा बँक एम्प्लॉईज युनियनसह विविध कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरून बँकांच्या ग्राहकांची जनजागृती करणार असून या अभियानाची सुरुवात बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांनी केल्याची माहिती कॅनरा बँक एम्प्लॉइज युनियन महाराष्ट्राचे सचिव राज वैद्य यांनी सोमवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकार राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरणाच्या माध्यमातून बँकांचे कर्ज बुडविणाऱ्या काही उद्योगपतींना लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कॅनरा बँक एम्प्लॉइज युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तोच वर्ग या बँकांवर आपली मालकी मिळवू पाहत आहेत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेधारक, सभासद, ठेवीदारांचे हित जपण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे नमूद करताना या लढ्यात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन कॅनरा बॅक एम्प्लॉइज युनियनतर्फे करण्यात आले आहे. केंद्र शासन रेल्वेनंतर आता बँकांचेही खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. आजही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये केंद्र सरकारचा मालकी हक्क ४९ टक्के आहे. परंतु, खासगीकरणाच्या माध्यमातून हा भागही केंद्र सरकार विक्रीला काढून जनसामान्यांचा कष्टाचा पैसा भांडवलदारांच्या घशात घालणार असल्याचा आरोप यावेळी कॅनरा बँक एम्प्लॉइज युनियनचे दिलीप पोटले, सुभाष भवारी, मोहन महाले आदींनी केला.