यावेळी घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लीना बनसोड यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दररोज माहिती संकलित करून ती ऑनलाइन अपलोड करण्यात यावी, अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या किमान ३० लोकांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी केली जावी, रुग्णाच्या रहिवास क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून त्यावर लक्ष केंद्रित करावे, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी, गृहविलिगीकरणात उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्ण घरी आहे किंवा नाही याची खात्री करावी तसेच त्याच्याशी संपर्कात राहावे अशा व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर तत्काळ त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. मास्कचा वापर व सुरक्षित अंतर पाळण्याबाबत ग्रामसेवकांनी दक्ष राहून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हॉटस्पॉट ठरलेल्या नगरसूल ग्रामपंचायतीच्या हद्दीत अधिकाधिक रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात यावी व येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या सूचनाही बनसोड यांनी दिल्या.
बैठकीस प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.