नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करून रुग्णांची हेळसांड करण्याच्या प्रकरणात आरोग्य विभागाने आपल्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत रुग्णांप्रती दाखविलेली असंवेदनशीलता मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मोडीत काढली आहे. आरोग्य विभागाचा अहवाल फेटाळत शिरसगावात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती. शिरसगाव (ठाणापाडा) प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या ४१ महिलांवर शस्त्रक्रिया करून त्यांना आरोग्य केंद्राची क्षमता नसतानाही दाखल करून घेतले व जमिनीवर दाटीवाटीने झोपविण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांना चौकशीकामी नेमून अहवाल मागविला होता. त्यानुसार साळवे यांनी शिरसगावी भेट देऊन माहिती घेतली असता, तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपला अहवाल तयार केला होता. शस्त्रक्रियेसाठी महिला स्वत:हून आल्या होत्या व त्यांना रुग्णालयाच्या क्षमतेविषयी पूर्ण कल्पना देण्यात आली होती. तसेच शस्त्रक्रियेनंतर त्यांची पुरेशी देखभाल केल्याचे व एकीलाही त्याचा त्रास झाला नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. हा अहवाल बनसोड यांना सादर केला असता, त्यांनी तो फेटाळून लावला. शस्त्रक्रियेसाठी काय नियम आहेत, त्यासाठी काय खबरदारी घेतली जाते, दरवर्षी कशाप्रकारे आयोजन होते अशाप्रकारे प्रश्नांचा भाडीमार करीत तो अहवाल फेटाळून लावला व शिरसगाव आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून झाल्या प्रकाराबद्दल खुलासा मागविण्याची सूचना केली. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सकांसह कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या आठ दिवसांत त्यांना खुलासा करण्याची मुदत देण्यात आली आहे.