सिडको : शासनाच्या वतीने लसीकरण देण्याची मोहीम राबविण्यात येत असून, नाशिक शहरासह सर्वच ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजीवनगर येथील तिघांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले होते; परंतु त्यांना लस घेण्यासाठी जाता आले नाही. असे असतानाही त्यांना शासनाकडून लस घेतल्याचे सर्टिफिकेट उपलब्ध झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
राजीवनगर येथील रहिवासी लक्ष्मीकांत बलबीर अधिकारी, कुसुम बलबीर अधिकारी व बलवीर रामदास अधिकारी यांनी लस घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर मोबाईलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केले होते. या तिघांनाही ११ एप्रिल रोजी लस घेण्यात यावी याबाबत मेसेज आला होता; परंतु त्यांना काही कारणास्तव लस घेण्यासाठी जाता आले नाही. त्यांना नाशिक येथील रेड क्रॉस या संस्थेच्या ठिकाणी लस घ्यावी असे कळविण्यात आले होते; परंतु त्यांना काही कारणास्तव तेथे लस घेण्यासाठी जाण्यास जमले नाही. असे असतानाही त्यांच्या मोबाईलवर त्यांनी लस घेतल्याचे शासनाचे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्याने शासनाचा हा सावळा गोंधळ समेार आला आहे .
---कोट---
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने यावर लस घेणे हा चांगला उपाय असल्याने मी व माझ्या आई-वडिलांसाठी लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते; परंतु लस न घेता शासनाने मला माझ्या मोबाईलवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाठविले. ही बाब गंभीर असून, याबाबत शासनाने दखल घेणे गरजेचे आहे
- लक्ष्मीकांत अधिकारी, नागरिक