नाशिक : राज्यातील २८८ आमदारांमधील तीन आमदारांनी बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविले असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी मंत्री मधुकरराव पिचड व पद्माकर वळवी यांनी दिली.चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे मूळ कोळी या विशेष मागास प्रवर्गातील असताना त्यांनी अनुसूचित जमातीतील टोकरी कोळी प्रमाणपत्र मिळवून आमदारकी लढविली आहे. आरमोरी (गडचिरोली)चे भाजपाचे आमदार कृष्णा गजबे हे कुणबी माना या बिगर आदिवासी जमातीतील असताना त्यांनी गौड माना जमातीचे प्रमाणपत्र मिळवून आमदारकी लढविली आहे. बागलाण (नाशिक) च्या आमदार दीपिका संजय चव्हाण भाट ठाकूर समाजातील असून, त्यांनी आदिवासी ठाकूर समाजातून आमदारकी लढविली आहे. तसेच नाशिक येथीलच व्यावसायिक विश्वास ठाकूर हेही भाट ठाकूर असून, ते बोगस आदिवासी असल्याचा आरोप माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केला आहे. विश्वास ठाकूर यांच्या बहिणीचे ठाकूर समाजाचे जात पडताळणी प्रमाणपत्र आदिवासी जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यांनी आता या विरोधात औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. जर राज्य सरकारचा एकाच कुटुंबातील रक्ताचे नाते असलेल्या नवीन कायद्याचा आधार घेतला, तर विश्वास ठाकूर यांनी मिळविलेले ठाकूर समाजाचे प्रमाणपत्रही रद्द समजण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे पद्माकर वळवी यांनी सांगितले.
तीन आमदारांचे प्रमाणपत्र बोगस : पद्माकर वळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 4:48 PM