नाशिक : इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी जवळपास ७ ते ८ टक्के विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, यात नीट व जेईई परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे सीईटी परीक्षा मार्गदर्शक शिक्षकांकडून सांगितले जात आहे.नाशिकमध्ये सीईटी परीक्षेला गुरुवार (दि.२) पासून सुरुवात झाल्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार २ ते १३ मे या कालावधीत आॅनलाइन पद्धतीने दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ४ व ५ मे व ६ मे रोजी सकाळच्या सत्रात नीट परीक्षेमुळे सीईटीला विराम देण्यात आला होता. त्यानंतर मात्र नियोजित वेळापत्रकानुसार ६ मे रोजी दुसऱ्या सत्रापासून ते १३ मेपर्यंत ही परीक्षा सुरळीत पार पडली. नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर राज्यभरातून सुमारे ३ लाख ९६ हजार विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. परंतु, अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षाही दिली असून, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा देण्याचे टाळल्याने या परीक्षेला साधारणत: सरासरी ९२ ते ९३ टक्क्यांपर्यंत उपस्थिती दिसून आली.सकाळच्या सत्रात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत, तर दुपार सत्रात पीसीएमबी गटाची परीक्षा दुपारी १२ पासून परीक्षा झाली. अन्य तीन विषयांचा समावेश असलेल्या गटाची परीक्षा दुपारी दोन वाजेपासून घेण्यात आली.विविध पर्याययावर्षी सीईटी परीक्षा देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम), तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) अशा तीन गटांत परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसारच आखण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाप्रमाणे रोज दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली.
इंजिनियरिंग, फार्मसीसाठीची सीईटी परीक्षा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:24 AM