नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या मूल्यांकनाचे धोरण स्पष्ट करतानाच अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेऊन त्याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अकरावीच्या ७७ हजार ५० जागांसाठी सीईटी परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, दहावीच्या परीक्षेला मुकलेल्या जवळपास ९९ हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून कसोटी लागणार आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर अखेर राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पद्धत निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील ६० उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील २५ हजार २७० जागांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २५० कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५१ हजार ८०० जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नाशिक जिल्ह्यातील २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावीत ५२ हजार ८०३ मुले, तर ४६ हजार १४६ हजार मुली असे एकूण ९८ हजार ९४९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे दहावीची परीक्षाच रद्द झाल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाटी सीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी दहावीचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेतलेले आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे त्यांना अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी होणार सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 12:40 AM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या मूल्यांकनाचे धोरण स्पष्ट करतानाच अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेऊन त्याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
ठळक मुद्दे९९ हजार विद्यार्थ्यांची कसोटी : शहरात ६०, ग्रामीणमध्ये २५० काॅलेज