नाशिक : निफाड तालुक्यातील चापडगावातील तंटामुक्तीचा पुरस्कार शासनाकडून जाहीर झाला आहे. शासनाने सुमारे दोन लाखांचा धनादेश पोलीस अधिकाऱ्यांकडून सरपंचांना प्रदान करण्यात आला.बागायती तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील सुमारे दीड हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या चापडगावला राज्य शासनाकडून तंटामुक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चापडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पंडितराव दराडे यांच्याकडे पोलीस उपअधिक्षक दिपक गिऱ्हे, पोलीस निरिक्षक आंबादास मोरे यांच्या हस्ते पुरस्काराच्या दोन लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील रमेश आव्हाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाऊलाल दराडे, भगवान दराडे, बाबुदादा दराडे, बबनराव दराडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.चापडगाव परिसरातील रहिवाशांमध्ये किरकोळ कारणांवरून उडणारे खटके आणि होणारे वाद गल्लीतच मिटवून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यापर्यंत वाद पोहचले नाही आणि गाव तंटामुक्त राहण्यास मदत झाल्याचे सरपंच राजेंद्र दराडे यांनी सांगितले. अद्यापपर्यंत या निफाड तालुक्यातील गोदाकाठालगतच्या पंचक्रोशीमधील करंजगाव, मांजरगाव या गावांनादेखील पुरस्कार मिळविला आहे.
चापडगावला तंटामुक्तीचा पुरस्कार
By admin | Published: May 22, 2017 5:31 PM