नाशिक : जबाबदारीच्या ओझ्याखाली त्रस्त झालेल्या नायकाला प्रेमाचे हात मिळूनही केवळ मानसिक गोंधळामुळे पुन्हा नीरस आयुष्य त्याच्या वाटेला येते. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे कथानक आणि त्या जोडीला सकस अभिनय यामुळे राज्य नाट्य स्पर्धेतील चाफा हे नाटक नाशिककर रसिकांच्या पसंतीस उतरले. शेवटच्या नाटकाच्या सादरीकरणानंतर प्राथमिक फेरीच्या नाट्य स्पर्धेची सांगता झाली.राज्य मराठी नाट्य स्पर्धेची सांगता शिरीष देखणे यांच्या ‘चाफा’ या नाटकाने झाली. चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या कथेवर आधारित या नाटकातील संहिताही मूळ कथेइतकीच प्रभावी ठरली. विष्णू मावळंणकर नावाच्या फटकळ शिक्षकाला आपल्या लंगड्या बहिणीसोबत जीवन व्यतीत करावे लागते. आई वारलेली आणि वडील परागंदा झालेले असताना अपंग बहिणीची जबाबदारी त्याच्यावर येते. तो आपली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे करीत असतो. असे नीरस जीवन जगत असताना त्याच्या आयुष्यात एक संध्या नावाची शिक्षिका येते. संध्याला विष्णू आवडू लागतो आणि एक दिवस ती त्याला लग्नाची मागणी घालते. तुझ्यासोबतच्या विवाहाने त्यात अडचण येऊ शकते, असे म्हणत तो तिला नकार देतो. नाटकाचे लेखन शिरीष देखणे व दिग्दर्शन राजेश शर्मा यांचे होते. नाटकात श्रृती कापसे, वैशाली देव व चंद्रवदन दीक्षित, संदीप कोते यांनी भूमिका निभावल्या. नेपथ्य शैलेंद्र गौतम, प्रकाशयोजना रवींद्र रहाणे, संगीत शुभम शर्मा, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा तेजस्विनी गायकवाड यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या.राज्य नाट्यस्पर्धा
दमदार संहितेने ‘चाफा’ फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:30 AM