नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१८ मधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात विस्थापित शिक्षकांच्या समन्वय समितीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात आले. परंतु शिक्षकांनी लेखी आश्वासनाची मागणी केली असता लेखी आश्वासन न मिळाल्याने शिक्षकांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाइन बदलीप्रक्रि येत जिल्ह्यातील ४६९२ शिक्षकांच्या एकाच दिवशी बदल्या करण्यात आल्या होत्या. यात मराठी माध्यमाच्या ४५७७ शिक्षकांचा समावेश आहे. त्यात ३८०२ शिक्षक, ५७७ पदवीधर, १८८ मुख्याध्यापकांचा समावेश असून, उर्दू माध्यमातील ११५ शिक्षकांमध्ये ७७ शिक्षक, ३५ पदवीधर व दोन मुख्याध्यापकांचा समावेश आहे. पात्र शिक्षकांना २० पर्याय देण्यात आले होते. त्यानुसार बदल्या झाल्या असल्या तरी या बदलीप्रक्रियेत ५९२ शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन आले असून, विस्थापित शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाने दिले; परंतु शिक्षक लेखी आश्वासनाच्या मागणीवर अडून बसले असून, विस्थापित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय शिक्षकांच्या समन्वय समितीने घेतला आहे.
विस्थापित शिक्षकांचे साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:29 AM