शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखांचे ‘कारभारी’ बदलले गेले. आठवडाभराचा कालावधीही उलटला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा ‘अंदाज’ही संबंधित नवनिर्वाचित पोलीस ठाणे प्रमुखांना आलाच असेल, त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याची कडेकोट ‘तजवीज’ या नव्या प्रमुखांकडून केली जाणे जनतेला अपेक्षित आहे.
ऑगस्टपासून आतापर्यंत शहरात दाखल साडेतीनशेपेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये २३५ गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे समोर येते, यावरून शहरात ऐन सणासुदीच्या तोंडावर गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येते. किरकोळ कारणातून भांडीबाजारात हॉटेल कामगाराच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या भल्या पहाटे करण्यात आली. या खुनाचा गुन्हा उलगडून तपासाला गती येत नाही, तोच पुन्हा केवळ वीस रुपये दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून पंचवटी भागात एका फिरस्त्या व्यक्तीवर धारधार वस्तूने वार करून सराईत गुन्हेगाराने खून केल्याची घटना घडली. लागोपाठ घडलेल्या या दोन्ही खुनांनी शहर हादरून गेले. हे गुन्हे घडल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या; मात्र अशा प्रकारचे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना अधिक कंबर कसावी लागणार आहे!
--इन्फो--
...अन् खबऱ्यांचे नेटवर्क खिळखिळे
चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे घडल्यानंतर पोलिसांकडून सर्वप्रथम आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातात. कॅमेरे चांगल्या दर्जाचे असले तर त्याच्या फुटेजचा उपयोग तपासासाठी होतोही; मात्र अनेकदा कॅमेरे केवळ नावापुरतेच असल्याचे समोर येते, अशा वेळी पोलिसांची ‘कोंडी’ होते. पोलिसांचे अंतर्गत खबऱ्यांचे ‘नेटवर्क’ खिळखिळे झाले असून केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार गुन्ह्यांची उकल करण्यासाठी घेतला जात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगू लागली आहे.
--इन्फो--
‘तडीपार’ म्हणजे काय रे भाऊ?
पोलिसांकडून शहर व परिसरातून सराईत गुन्हेगारांना हद्दपार, तडीपार एक वर्ष किंवा दोन वर्षांसाठी केले जाते; मात्र हे तडीपारीचे आदेश केवळ ‘कागदोपत्री’ राहतात की काय? अशी शंकाही घेतली जात आहे. कारण तडीपार गुंडांचा वावर पोलिसांना शहरात वारंवार आढळून येतो आणि त्यांना अटक करण्याची नामुष्कीदेखील ओढावते. यावरून तडीपारीच्या कारवाईचे गुंडांमध्येही फारसे गांभीर्य राहिल्याचे दिसत नाही.
--
- अझहर शेख