नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उषा अहिरे आणि शिवसेना पुरस्कृत शोभा निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. फेबु्रवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक होणार असल्याने जानेवारी महिन्यातच आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सभापतिपद भूषविता येणार आहे. दरम्यान, उपसभापतिपदासाठी मनसेच्या अर्चना जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. येत्या गुरुवारी (दि.२२) दुपारी ४ वाजता सभापती-उपसभापती या पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.महिला व बालकल्याण समितीवर दरवर्षी नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाते. विद्यमान समितीची मुदत १२ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्यानंतर नव्याने नऊ सदस्यांची पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार १६ आॅगस्टला नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये मनसेच्या अर्चना जाधव, रेखा बेंडकुळे व कांचन पाटील, शिवसेनेच्या शोभा निकम व ललिता भालेराव, राष्ट्रवादीच्या उषा अहेर व सुनीता शिंदे, भाजपाच्या ज्योती गांगुर्डे आणि कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी मागील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. त्यानुसार, दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता महिला व बालकल्याण समितीच्या कार्यालयात अपर आयुक्त जे. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सत्ताधारी गटाकडून सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून उषा विनायक अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी मनसेच्या अर्चना संजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नगरसचिव ए. पी. वाघ यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, मनसेचे गटनेते अनिल मटाले, नगरसेवक विमल पाटील, कांचन पाटील, कॉँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड, नामदेवराव पाटील आदि उपस्थित होते. विरोधी गटाकडून जनराज्य पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शोभा बाबूराव निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत केवळ सेनेच्या नगरसेवक कल्पना पांडे उपस्थित होत्या. निवडून येणाऱ्या उमेदवाराला औटघटकेच्या तीन महिन्यांसाठी सभापतिपदाचा कार्यकाळ मिळणार आहे. (प्रतिनिधी)
तीन महिन्यांसाठी सभापती; निवडीची औपचारिकता
By admin | Published: September 21, 2016 1:04 AM