नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये डझनभर आजी-माजी आमदारांसह दोघा खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच जिल्हा परिषदेच्या विद्यमान सहापैकी पाच पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाची निवडणूक सर्वच तालुक्यात सर्वाधिक चुरशीची होण्याची शक्यता होते, प्रत्यक्षात तसेच घडत असून, या निवडणुकीत दोघा खासदारपुत्रांसह चौघे विद्यमान आमदार व अर्धा डझनहून अधिक माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सहापैकी पाच पदाधिकारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विद्यमान अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचे पती रत्नाकर चुंबळे हे नाशिक तालुक्यातील गोवर्धन गटातील विल्होळी गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या पत्नी प्रिया प्रकाश वडजे या सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडूनच अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. समाजकल्याण सभापती उषा शंकर बच्छाव या बागलाण तालुक्यातील वीरगाव गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडूनच उमेदवारी करीत आहेत. शिक्षण व आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे याही राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निफाड तालुक्यातील विंचूर गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)
अध्यक्ष, उपाध्यक्षांसह तिघा सभापतींची प्रतिष्ठा ‘टांगणीला’
By admin | Published: February 18, 2017 12:27 AM