नाशिकरोड- केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बहुजन शेतकरी संघटना आणि शिवसेनेने शनिवारी (दि. ६) सकाळी नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नरफाटा येथे चक्का जाम आंदोलन केले. अवघ्या काही वेळातच पेालिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि झटापट झाली. यावेळी ३५ आंदाेलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र शासनाने केलेले कृषी विधेयक मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी संघटनेचे नेते दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, अशोक खालकर, ॲड. तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत कृषी विधेयक रद्द करण्याची मागणी करीत परिसर दणाणून सेाडला. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काही वेळातच चक्काजाम आंदोलन करणाऱ्या ३५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अन्य आंदोलनकर्त्याना सिन्नरफाटा चौकातून बाजूला करून पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.
या आंदोलनात रमेश औटे, अशोक सातपुते, गोरखनाथ बलकवडे, वसंत अरिंगळे, नगरसेवक संतोष साळवे, रमेश धोंगडे, जगदीश गोडसे, शिवाजी भागवत, सुनील आडके, नियामत शेख, मसूद जिलानी, चंदू साडे, विनोद गांगुर्डे, भाऊसाहेब अरिंगळे, सुदाम बोराडे, तुकाराम पेखळे, शिवाजी करंजकर, भास्कर गोडसे, बळवंत गोडसे, भास्कर सातव, नितीन खर्जुल, हरिष भडांगे, अंबादास ताजनपुरे आदी सहभागी झाले होते.