सटाणा : महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटाच लावल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजपचे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २६) राष्ट्रीय महामार्गावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन छेडले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
महावितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली सुरू करून शेतकऱ्यांच्या बांधावरील सर्व विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शुक्रवारी (दि. २६) राष्ट्रीय मार्गावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून ठिय्या दिला. या रास्ता रोकोमुळे चौफुलीवरील चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष आहिरे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विलास बच्छाव, शेतकरीमित्र बिंदुशेठ शर्मा, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक देवरे आदींनी मनोगत व्यक्त करून सक्तीची वीज बिल वसुली व विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धोरणाचा जाहीर निषेध केला.
वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांनी निवेदन स्वीकारून, आंदोलकांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले. यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष अनमोल यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.