जानोरी : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाविषाणूच्या दुसऱ्या लाटेने दिंडोरी तालुक्यात देखील मोठा प्रभाव दाखवला आहे. पहिल्या लाटेपासून दूर राहिलेला तालुक्याचा पश्चिम आदिवासीबहुल भाग देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला. आदिवासी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण दिंडोरी तालुका लसीकरण करून कोरोना विषाणूंच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना आरोग्य विभागाकडे अडचणीचा डोंगर उभा ठाकला आहे.आरोग्य विभागाला कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले आदिवासी भागात देखील मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने अनेक आदिवासी बांधव बाधित झाले होते. तालुक्यात कॉविड केअर सेंटरची अपुरी संख्या व अत्यल्प सुविधा बघता अनेक नागरिकांना उपचारासाठी नाशिकच्या सामान्य रुग्णालय येथे जाऊन उपचार घ्यावे लागले. प्रशासनाने मोठ्या अडचणीनंतर तालुक्यातील वणी येथील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड रुग्णालय सुरू केले. त्याठिकाणी देखील ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. बोपेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा नसल्याने आरोग्य विभागाला अडचणीचा सामना करावा लागला.तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण एकाच वेळेस बाधित झाल्याने अनेकांना उपचारासाठी गृहविलगिकरण कक्षातच राहावे लागले. त्यामुळे कुटुंबातील अनेक व्यक्ती बाधित होण्याचा प्रसंग देखील अनेक ठिकाणी आले. संपूर्ण तालुक्यात शंभरच्यावर रुग्ण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावले.तालुक्यात कोरोनाविषाणूचा संसर्ग वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात कोरोना विषाणूबद्दल अनेक गैरसमज तसेच अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. अनेक रुग्ण विषाणूची लक्षणे दिसत असून देखील उपचारासाठी पुढे येत नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत गेला.तालुक्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आदिवासी नागरिक पुढे येत नसल्याने कोरोना मुक्त दिंडोरी तालुका करण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाची मोठी तारेवरची कसरत पहावयास मिळाली. दिंडोरी तालुक्यात १० ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यापैकी मोहाडी, तळेगाव, वरखेडा, उमराळे, कोचरगाव, पांडाणे, निगडोळ, वणी, वारे, ननाशी येथे लसीकरण सोबतच सुरू झाले.परंतु तालुक्यातील मोहाडी, तळेगाव, खेडगाव, पांडाणे या आरोग्य केंद्रातच लसीकरण मोठ्या संख्येने संपन्न झाले. परंतु बाकीच्या सहा आदिवासीबहुल आरोग्य केंद्रात अत्यंत कमी प्रमाणात लसीकरण झाल्याने आरोग्य विभागाकडे १०० टक्के लसीकरण करण्याच्या उद्दिष्टाला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला.आरोग्य विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती राबवण्यात आली. तसेच दिंडोरी तालुक्याचे प्रांत अधिकारी व दिंडोरीचे तहसीलदार यांनी देखील आदिवासी भागात जाऊन नागरिकात मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले.
दिंडोरीतील आदिवासी भागात १०० टक्के लसीकरणाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 10:24 PM
जानोरी : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाविषाणूच्या दुसऱ्या लाटेने दिंडोरी तालुक्यात देखील मोठा प्रभाव दाखवला आहे. पहिल्या लाटेपासून दूर राहिलेला तालुक्याचा पश्चिम आदिवासीबहुल भाग देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला. आदिवासी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
ठळक मुद्दे१०० टक्के लसीकरण करण्याच्या उद्दिष्टाला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला.