नाशिक : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांशी निगडित असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाने अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी घोषित केली आहे. कॉँग्रेसने यापूर्वीच आमदार कुणाल पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे, तर भाजपाचेच आमदार अनिल गोटे यांनीही उमेदवारीचे आव्हान उभे करण्याचे संकेत दिल्याने धुळे मतदारसंघात लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि बागलाण विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पूर्वी कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला धुळे मतदारसंघ १९९६ पासून भाजपाच्या ताब्यात राहिला आहे. सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे प्रतापदादा सोनवणे यांनी कॉँग्रेसचे अमरिशभाई पटेल यांचा पराभव केला होता, तर मागील लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये भाजपाने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली होती.भामरे यांनी कॉँग्रेसचे अमरिशभाई पटेल यांचा एक लाख ३० हजार मतांनी पराभव करत दिल्ली गाठली होती. डॉ. सुभाष भामरे यांनी पाच लाख २९ हजार ४५० इतकी मते घेतली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ५३.८५ टक्के इतकी राहिली. सतराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर धुळे मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भाजपाने उमेदवारी घोषित केली आहे. त्याअगोदर कॉँग्रेसने धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री रोहिदासदाजी पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे.तत्पूर्वी, रोहिदास पाटील यांच्या नावाची चर्चा होती. त्यात नाशिक जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हेसुद्धा कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु, कॉँगे्रेसने कुणाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने तुषार शेवाळे यांचा समर्थक गट नाराज झाला आहे.स्वत: शेवाळे यांनीही नाराजी बोलून दाखविली आहे. त्यामुळे, कॉँग्रेसचे कुणाल पाटील यांना पक्षांतर्गतच नाराजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही़ भाजपा व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये नाराज गटाच्या उमेदवारांना मुकाबला करावा लागण्याची शक्यता आहे.गोटे-शेवाळे यांच्या भूमिकेकडे लक्षधुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल गोटे यांचे धुळे महापालिका निवडणुकीपासून डॉ. सुभाष भामरे आणि गिरीश महाजन यांच्याशी संबंध ताणले गेले आहेत. भामरे आणि महाजन यांच्याविरोधात एल्गार पुकारणारे अनिल गोटे यांनी आता लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भामरे यांच्यापुढे पक्षांतर्गतच आव्हान उभे ठाकणार आहे. त्यातच गोटे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सहकार्य करण्याची भूमिका मांडल्याने बदलणाऱ्या राजकीय समीकरणांकडेही लक्ष लागून असणार आहे. भाजपाबरोबरच कॉँग्रेसमध्येही पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटत आहे. नाशिक जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना उमेदवारी नाकारल्याने शेवाळे हेसुद्धा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. धुळे मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यातधुळे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाविरुद्ध शड्डू ठोकण्याचे संकेत दिले आहेत. धुळे महापालिका निवडणुकीत गोटे यांनी भाजपाविरुद्ध उभारलेले बंड आणि गिरीश महाजन व डॉ.सुभाष भामरे यांच्याविरुद्ध सातत्याने घेतलेली विरोधाची भूमिका पाहता, गोटे यांनी उमेदवारी केल्यास त्याचा फटका भाजपा उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.२९ एप्रिलला मतदान होणार आहे आणि त्यासाठी अधिसूचना २ एप्रिलला जारी होणार आहे. तोपर्यंत होणाऱ्या राजकीय उलथापालथीकडेही लक्ष लागून असणार आहे.
भामरे-पाटील यांच्यासमोर नाराज गटाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 1:52 AM
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांशी निगडित असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाने अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी घोषित केली आहे. कॉँग्रेसने यापूर्वीच आमदार कुणाल पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे, तर भाजपाचेच आमदार अनिल गोटे यांनीही उमेदवारीचे आव्हान उभे करण्याचे संकेत दिल्याने धुळे मतदारसंघात लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देधुळे लोकसभा मतदारसंघ : अनिल गोटे यांनीही उमेदवारीचे संकेत दिल्याने लढत ठरणार रंगतदार