नाशिक : भाजपा वगळता सर्वच पक्षांनी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील एसपीव्हीला नाकारल्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेला आव्हान देऊ पाहणाऱ्या सत्ताधारी मनसेविरुद्ध भाजपा एकवटली असून, सेना-मनसेतील ‘आयात’ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन महापौर तथा महासभेच्या पीठासनाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाऐवजी सभागृहातील कल पाहून गुणवत्तेच्या आधारावर स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली आहे. भाजपाने पीठासनाधिकाऱ्याच्या निर्णयाला आव्हान देतानाच महासभेच्या कामकाजाचे इतिवृत्त तपासून पाहण्याचीही मागणी केली आहे. मात्र, आयुक्तांनी इतिवृत्तात बदल होऊ शकत नसल्याचे सांगत महापौरांचा निर्णय हा अंतिम असल्याचे स्पष्ट केल्याने भाजपेयींचा चेहरा पडला.‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव मंगळवार दि. १५ डिसेंबरपर्यंत शासनाला सादर करावयाचा असल्याने सत्ताधारी मनसेने एसपीव्ही वगळता ठराव रद्द करून तो एसपीव्हीसह प्रशासनाकडे द्यावा, यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी महासभेचे इतिवृत्त तपासून पाहण्याची विनंती केली. यापूर्वी झालेल्या महासभेने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव अटी-शर्तींसह स्वीकारलेला आहे. दि. २ डिसेंबरला झालेल्या महासभेत सर्व सदस्यांनी केवळ करवाढीला विरोध केला असून एक-दोन सदस्य वगळता सर्वांनीच स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केलेली आहे. मात्र, सभेअंती महापौरांनी एसपीव्ही व करवाढ वगळून प्रस्तावाला मान्यता दिली. सदरचा ठराव विपरीत असून, आयुक्तांनी महासभेच्या कामकाजाचे इतिवृत्त तपासावे आणि सभागृहाचा कल लक्षात घेऊन गुणवत्तेच्या आधारावरच स्मार्ट सिटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी विनंती केली. मात्र, आयुक्तांनी महासभेचा निर्णय हा अंतिम असल्याचे सांगत इतिवृत्तात कोणताही बदल होऊ शकत नाही. महापौरांच्या स्वाक्षरीचाच ठराव अंतिम मानला जातो व त्यानुसारच प्रशासनाकडून कार्यवाही केली जात असते. परंतु महापौरांकडून नंतर त्यात सूचनांचा अंतर्भाव केला जाऊ शकतो, असेही स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागुल, सचिन ठाकरे, विजय साने, सतीश कुलकर्णी, महेश हिरे आदिंसह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पीठासनाच्या अधिकारालाच भाजपाचे आव्हान
By admin | Published: December 15, 2015 12:35 AM