पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंचवटी विभागात शिवसेना, भाजपा, मनसे, बसपा व अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या सर्वांनीच उमेदवारीची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे कॉँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने कॉँग्रेसला पंचवटीत उमेदवार शोधासाठी आव्हान ठरत आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील पंचवटी विभागाकडे दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. सध्या पंचवटीत केवळ बोटावर मोजण्या इतक्याच काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केली असली तरी प्रभागात पॅनल उभे करण्यासाठी उमेदवार मिळत नसल्याची टीका टिप्पणी अन्य पक्षांकडून होत आहे. सध्या कॉँग्रेस शहर अध्यक्षपदाची जबाबदारी शरद अहेर यांच्याकडे असली तरी त्यांनीदेखील अद्याप पंचवटी विभागातील कोणत्याही उमेदवारांच्या मुलाखती घेणे किंवा पॅनलसाठी उमेदवार कोण आहेत याची चाचपणीदेखील केलेली नसल्याने पक्षाकडून इच्छुकांनीच स्वत:चे प्रचार पत्रके छापून ते मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले आहे. कॉँग्रेसच्या बळावर दोनवेळा निवडून आल्यानंतर स्थायी सभापतिपद भोगणाऱ्या उद्धव निमसे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला, तर सध्याच्या विद्यमान नगरसेवक विमल पाटील यादेखील शहर विकास आघाडीकडून निवडणुकीच्या तयारीत आहेत. (वार्ताहर)
उमेदवार शोधासाठी आव्हान
By admin | Published: January 28, 2017 11:58 PM