नाशिक : वाढलेली वित्तीय तूट, कमी झालेला विकासदर आणि भाववाढीचा जटिल प्रश्न ही देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने असून, गुंतवणुकीचे चक्र फिरण्यासाठी सरकारला धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत. गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्मितीची गरज असल्याचेही प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रहास देशपांडे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मुक्तांगण यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलताना केले. कुसुमाग्रज स्मारकात आयोजित व्याख्यानात ‘भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने’ या विषयावर बोलताना देशपांडे यांनी सांगितले, महागाई, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि शैथिल्य यामुळे देश वैफल्याने ग्रासला होता. त्यामुळे त्वरित निर्णय आणि परिणाम यासाठी जनमानस अस्वस्थ आहे. गर्तेत सापडलेली अर्थव्यवस्था नवीन सरकार स्थापनेनंतर सावरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठी आधीच्या सरकारनेही घेतलेल्या काही निर्णयांमुळे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. निर्यातवाढ वेगाने होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ५.७ टक्क्यांवर गेला आहे. विदेशी गुंतवणूकही वाढते आहे. आज देशापुढे विजेचे मोठे संकट आहे. पुरेसा कोळसा उपलब्ध नाही. त्यामुळे विकासात अडसर येऊ शकतो. दूरगामी सकारात्मक परिणाम समोर आणायचे असतील, तर लोकाभिमुख आणि लोकानुनय निर्णय यात फरक करावा लागणार आहे. नव्या सरकारकडून अर्थव्यवस्थेविषयी काही सकारात्मक संदेश मिळू लागल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. देशात गुंतवणूक वाढली, तर उत्पन्नात वाढ होणार आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गुंतवणूक हाच सर्व प्रश्नांचा कळीचा मुद्दा असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. श्याम अष्टेकर यांनी केले. (प्रतिनिधी)