नाशिक : ५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षलागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्याला एक कोटी ९२ लाख ३० हजार रोपांचे उद्दिष्ट वन मंत्रालयाकडून दिले गेले आहे. त्यापैकी वनविभागाकडून ८८ लाख रोपे लावली जाणार आहेत. याबाबत उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांच्याशी साधलेला संवाद
यंदा जिल्ह्याला किती रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे? त्यानुसार कशी तयारी सुरू आहे?
- शासनाच्या वृक्षलागवड अभियानाचा अखेरचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत राज्यभरात ३३ कोटी रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य पार पाडले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यालादेखील सालाबादप्रमाणे उद्दिष्ट मिळाले असून, १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपांच्या लागवडीचे लक्ष्य नाशिक जिल्हा गाठणार आहे. नाशिक पूर्व, पश्चिम वनविभागासह सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळासह अन्य सरकारी, निमसरकारी यंत्रणाही सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने वनविभागाकडून सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. जवळपास जिल्ह्यात पूर्व, पश्चिम विभागात तसेच सामाजिक वनीकरणाच्या अखत्यारितीत असलेल्या क्षेत्रात खड्डे खोदण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. नाशिक पश्चिम विभागाला २६, तर पूर्व विभागाला २८ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.
रोपांच्या उपलब्धेबाबत काय सांगाल?- सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोपेनिर्मिती मागील तीन वर्षांपासून केली जात आहे. रोजगार हमी योजनेतून रोपांच्या निर्मितीला प्राधान्य दिले गेले आहे. यावर्षीदेखील एकूण उद्दिष्ट लक्षात घेता सुमारे ५० लाख रोपे जिल्ह्यासाठी अतिरिक्त तयार आहेत. संपूर्ण जिल्ह्याकरिता वनविभागासह अन्य शासकीय यंत्रणा लक्षात घेऊन सुमारे २ कोटी ४३ लाख रोपे सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतांश रोपे ही दीड ते दोन वर्षे वाढ झालेली आहेत.
रोपे लागवडीमध्ये कोणत्या प्रकारच्या प्रजातींवर भर दिला जाणार आहे?- वनक्षेत्र वाढविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या अशा भारतीय प्रजातीच्या रोपांची निर्मितीवर भर दिला गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने हिरडा, बेहडा, आवळा, बांबू, खैर, करंज, कडूनिंब, काशिद, शिवण, कांचन, ताम्हण, उंबर, अर्जुनसादडा, कदंब यांसारख्या विविध प्रजातींचा समावेश आहे.
रोपे वाटप प्रक्रियेविषयी थोडक्यात सांगा?- जून अखेरपासून रोपांचे वाटप रोपवाटिकांमधून केले जाणार आहे. ग्रामपंचायती वगळता अन्य सर्व शासकीय, निमशासकीय, सामाजिक संस्थांना शासनाच्या सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला तीन हजार २०० रोपांचे कमाल उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. त्यानुसार रोपे वाटप केली जातील.
- अझहर शेख