नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) मधील पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व ११ उमेदवारांचे अर्ज बुधवारी (दि.२१) झालेल्या छाननीत वैध ठरविण्यात आले. दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कुटुंबीयांकडून बिनविरोध निवडीचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर मनसेपुढे सेना-भाजपाने तगडे आव्हान उभे केले आहे. मनसेला कॉँग्रेस-राष्टÑवादीने पाठबळ दिल्याने पोटनिवडणुकीत चुरशीचा सामना बघायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक १३ (क) मधील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्नेहल संजय चव्हाण, मनसेकडून अॅड. वैशाली मनोज भोसले तसेच डमी म्हणून रश्मी सचिन भोसले, भाजपाकडून विजया हरिष लोणारी तर डमी म्हणून कीर्ती प्रतीक शुक्ल या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर अपक्ष म्हणून ज्योती नागराज पाटील, समीना कयुम पठाण, अवंतिका किशोर घोडके, माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव, माजी नगरसेवक रंजना ज्ञानेश्वर पवार आणि समीना मकसूद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांच्यासमोर प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी सर्व उमेदवार उपस्थित होते. अर्जावर पुराव्यानिशी आक्षेप घेण्याची सूचना निवडणूक अधिकाऱ्यांनी केली परंतु, एकानेही आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व ११ अर्ज वैध ठरविण्यात आले. आता दि. २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.राज यांच्या सभेची शक्यता?एखादा लोकप्रतिनिधी दिवंगत झाल्यानंतर त्याच्या जागेवर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत आहेत. परंतु, सेना-भाजपाने केलेली प्रतिष्ठा पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे मनसेची स्थिती अवघड बनली आहे. मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द राज ठाकरे यांची एखादी सभा प्रभागात लावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोटनिवडणुकीसाठी मनसेला शिवसेना-भाजपाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:02 AM