भगवान गायकवाड दिंडोरीयंदा टिटवे गण (पूर्वीचा देवसाने) अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असून, सभापतिपदही या प्रवर्गासाठीच राखीव आहे. आता या मैदानात दोघाही आजी माजी आमदारांना मुलांच्या लॉन्चिंगची संधी आहे; मात्र दोघेही तूर्तास कुटुंबाऐवजी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या तयारीत आहेत. कॉँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही या गणाकडे लक्ष केंद्रित केले असून, आमदारांच्या त्रिकुटी कार्यकर्त्यांमध्ये येथील लढत रंगण्याची चिन्हे दिसत असून, राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी शिवसेना व कॉँग्रेसचे आव्हान पेलावे लागणार आहे. एकंदरीत या गणाचे राजकारण हे महाले व झिरवाळ कुटुंबीयांशी निगडित राहिले आहे.टिटवे गणात पूर्वी जनता दल, कॉँग्रेस व माकप असा नेहमी संघर्ष होत होता. यात जनता दलाने बऱ्याच वर्ष येथे आपला दबदबा ठेवला. स्व. हरिभाऊ महाले, आमदार नरहरी झिरवाळ येथून सदस्य होत पंचायत समितीचे उपसभापती झाले. पुढे झिरवाळ यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. विक्र मी मतांनी जिल्हा परिषद गाठत लागलीच विधानसभा सर केली. तेव्हापासून या गटावर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व ठेवत सर्वच निवडणुकांमध्ये आघाडी घेतली. दरम्यानच्या काळात जनता दल राष्ट्रवादी एकत्र होते तर झिरवाळ आमदार होते. याच काळात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत धनराज महाले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार अशी अटकळ होती मात्र ऐनवेळी गोपीनाथ गांगुर्डे यांना उमेदवारी मिळाली व महाले यांनीही अपक्ष उमेदवारी करत राष्ट्रवादीला शह दिला; मात्र निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी वाऱ्याची दिशा ओळखत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला अन् विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांचा निसटता पराभव करत विधानसभा गाठली. महाले आमदार असताना झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत हा गण नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी राखीव होता. यावेळी महाले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र झिरवाळ यांनी आपले गणावरील वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या जयश्री सातपुते या बहुमताने विजयी झाल्या. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात येथे विकासकामे करत आपल्या कामाचा ठसा उमटविला. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले. तसे महाले व झिरवाळ यांच्यात निवडणुका जरी संघर्षाच्या झाल्या असल्या तरी त्यांचा कौटुंबिक नात्यावर त्याचा परिणाम झालेला नसून या निवडणुकीत त्यांची पुढची पिढी समोरासमोर येईल, अशी साऱ्यांची अटकळ होती; मात्र दोघांनीही तूर्तास कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहता राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने एका इच्छुकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेला आव्हान देण्याचा पवित्रा घेतला असून, येथील लढत तिन्ही आमदारांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असणार आहे तर भाजपा, माकप हे उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. ते कुणाच्या मतांची बेरीज वजाबाकी करणार यावर लढत रंगणार आहे. जातीय समीकरणही डोक वर काढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीला गड राखण्याचे आव्हान
By admin | Published: February 02, 2017 11:16 PM