नाशिक : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ९० कर्मचारी मानधनावर भरण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास सीटूप्रणित नाशिक महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. त्याचबरोबर महापालिकेने सरळ सेवा पद्धतीने कायमस्वरूपी भरती करावी, अशी मागणी करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभाग केवळ आपत्तीतच नव्हे तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबतदेखील दक्ष असतो अशावेळी मानधनावरील कर्मचारी नियुक्त करणे अयोग्य असल्याचेदेखील संघटनेने पत्रात नमूद केले आहे.महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन (अग्निशमन दल) विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. लवकरच पावसाळा सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता या विभागासाठी ९० कर्मचारी मानधनवर भरती करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनेने आयुक्तांना पत्र दिले असून, त्यात मानधनावर भरती करण्यास विरोध केला आहे. केंद्र शासनाच्या संरक्षण दलानुसारच आपत्ती व्यवस्थापन विभाग सदैव सज्ज असतो. अत्यंत जबाबदारी आणि जोखमीचे हे काम असते. आग आणि पावसाळाच नव्हे तर भूकंपासारख्या आपत्तीतदेखील कर्मचारी काम करतात. दंगलीतदेखील या विभागाचे कर्मचारी काम करतात. कित्येकदा राष्टÑीयदृष्ट्या महत्त्वाच्या तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेतदेखील या दलाचे कर्मचारी नियोजनापासूनच सहभागी असतात. त्यामुळे याठिकाणी जबाबदार कर्मचारी कायमस्वरूपीच नेमले पाहिजे, असे संघटनेने नमूद केले आहे.विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागात कर्मचारी भरतीचा प्रस्ताव पाठविला होताच, परंतु कायम पदासंदर्भातील आकृतिबंध राज्य शासनाकडे प्रलंबित आहे.सरळ सेवा पद्धतीने भरती राबवावीनागपूर, नवी मुंबई आणि मीरा भार्इंदर यांसारख्या महापालिकांचे आकृतिबंध शासनाने मंजूर केले आहेत, मग नाशिक महापालिकेचा आकृतिबंध मंजूर का होत नाही, असा प्रश्न करीत शासनाकडे पाठपुरावा करून हा आकृतिबंध मंजूर करावा आणि तातडीने सरळ सेवा पद्धतीने कर्मचारी भरती मोहीम राबवावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, अॅॅड. तानाजी आगलावे, जगदीश देशमुख, एस. एस. आगलावे, पी. जी. लहामगे यांनी केली आहे.
आपत्ती व्यवस्थापनात मानधनावर भरतीस आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:04 AM