नाशिक : लक्षद्वीपच्या दक्षिण व पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हे क्षेत्र पुढील तीन दिवसांत वरच्या बाजूने सरकत अधिक दाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे रविवारी (दि.७) जिल्ह्यात काही भागात बेमोसमी पाऊस होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. लक्षद्वीप-कर्नाटक सागरी किनारपट्टीत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: सातारा, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. शनिवारी व रविवारी मुंबई व ठाण्यातदेखील हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे नाशकातील काही ठरावीक भागात रविवारी हलक्या सरींचा वर्षावाचा अंदाज वर्तविला गेला आहे. यामुळे तूर्तास तरी बेमोसमी पावसाचा मोठा धोका नसल्याची चिन्हे आहेत.
शहरात सध्या कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या जवळपास तर किमान तापमानाचा पारा १७ अंशापर्यंत वाढला आहे. यामुळे तीन दिवसांपासून शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे.