येवला : नाशिक जिल्ह्यात सोमवार, दि.१८ व १९ जानेवारी या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने शेतकऱ्यांनी जीवित व वित्तहानी होणार नाही यासाठी काळजी घेऊन, पूर्वतयारी करण्याचे आवाहन येवला तहसीलदार शरद मंडलिक यांनी केले आहे. हवामान खात्याने जिल्हाधिकारी यांना याबाबतची सूचना केल्यानंतर येवला तहसीलदारांना याबाबत सुचित करण्यात आले आहे. याबाबत भ्रमणध्वनीवरून तहसीलदार यांचेशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, हवामान खात्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्याबाबत कळविले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान होऊ नये म्हणून आपल्या शेतातील उत्पादित माल सुरक्षित ठिकाणी हलवावा. सध्या शेतकऱ्यांचा कांदा शेतशिवारात उघडा पडला आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय अन्य सुरक्षित उपाययोजनादेखील करावी. वातावरणाच्या बदलानुसार घराबाहेर पडावे किंवा नाही याचा अंदाज घ्यावा असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. दुपारपासून व्हॉट्सअॅपवर वादळीवाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज आहे याबाबत संदेश फिरत होते. या संदेशाची विश्वासार्हता पडताळून पाहण्यासाठी लोकमतने थेट येवला तहसीलदार शरद मंडलिक यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.
जिल्ह्यात दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता
By admin | Published: January 17, 2016 12:49 AM